हडपसर :
रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालयात मराठी विषयाचे पीएच.डी. संशोधन केंद्र सुरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. या संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाल्याने या परिसरातील संशोधन करु इच्छिणाऱ्या होतकरू संशोधन उत्सुक विद्यार्थ्यांना या निमित्ताने सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पीएच.डी. संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2021- 22 मधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्र निवडीचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे .त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत असताना एस. एम. जोशी संशोधन केंद्रास प्राधान्य द्यावे , असे आवाहन डॉ. पांडुरंग भोसले ,डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी केले.