पुणे

पुणेकर व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश : कोरोना निर्बंधात सूट : दुकाने दिवसभर तर हॉटेल रात्री 10 पर्यंत परवानगी

पुणे : पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

पुण्यातील वीकेंड लॉकडाउनही रद्द करण्यात आला आहे. दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. दुकाने , हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी  पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ग्रामीण भागात मात्र चार  वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले परिस्थिती गंभीर असतानाही काही राजकीय प्रश्न राजकारण करतात.

दुकानाच्या वेळा बदलण्याबाबत प्रशासनाकडे पुणे व्यापारी महासंघाने मागणी केली होती. परंतु, त्यांच्या मागणीला अद्याप यश आले नव्हते. एकीकडे व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, तर दुसरीकडे प्रशासनही वेळेत सूट द्यायला तयार नव्हते.

राज्यात निर्बंध शिथिल न झालेल्या १४ जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. परंतु पॉझिटिव्हिटी रेट ३ च्या आत असल्याने पुणे व्यापारी वर्गाकडून दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी होत आहे. त्या संदर्भात व्यापाऱ्यांनी घंटानाद आंदोलनही केले होते. त्यानंतर दोन दिवस शहरातील व्यापारी सायंकाळपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात ठाम होते. मात्र आता चार नंतर दुकने उघडी ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील रविवारी बैठकीत व्यापाऱ्यांची मागणी ठेवण्यात येईल, असे महापौर आणि पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. त्या मागणीला अखेर यश आले आहे. 

राज्यातील २२ जिल्ह्य़ांमधील र्निबध शिथिल करण्यात आले असून तेथे दुकानांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मात्र, करोनाबाधितांची संख्या कमी असतानाही प्रशासनाने पुण्यातील दुकानांना वेळ वाढवून न दिल्याने व्यापाऱ्यांनी बुधवारपासून शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवली होती.