पुणे

“वाहने भाड्याने देतो, असे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या”

लोणी काळभोर (प्रतिनिधी स्वप्नील कदम)

वाहने भाड्याने देतो असे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने  बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी पुण्यातील एकाला कंपनीत वाहन भाडेतत्वावर लावून देतो असे सांगून अनेकांची फसवणूक केली. गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने केलेल्या तपासात आरोपींनी 2 लाख 40 हजार रुपये किंमतीने भाड्याने घेऊन 28 वाहने परराज्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अविनाश बालाजी कदम (वय-28 रा. ढोरे फेज 4, जूना फुरसूंगी रोड) यांनी दिलेल्या
फिर्यादीवरुन मालिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय-38 रा. फ्लॅट नं. 405,
युनिट टॉवर, शिवनेरीनगर, कोंढवा), ओंकार ज्ञानदेव वाटाणे (वय-28 रा. मु.पो. हिंगणी बेर्डी. ता. दौंड)
व मोहमद मुजीब मोहमद बसीरउद्दीन (वय-48 वर्षे संतोषनगर, हैदराबाद) यांना अटक करण्यात आली आहे.

अविनाश कदम हे ओला कंपनीमध्ये स्वत:ची स्विफ्ट डिझायर कार चालवतात.
कार चालवित असताना त्यांची ओळख गिलानी याच्यासोबत झाली. त्याने तो नोएडा, उत्तर प्रदेश येथील युनायटेड एस एफ सी सर्व्हिस  नावाची नेटवर्क टॉवरची कंपनीमध्ये  नोकरीस असल्याचे सांगितले.
त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे अमिष दाखून 15 मार्च ते 27 जुलै या साडेचार महिन्याच्या कालावधीत कदम व त्यांच्या ओळखीच्या इतरांची 28 चारचाकी वाहने ताब्यात घेतली.

ताब्यात घेतलेल्या वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली व वाहने घेऊन तो फरार झाला होता. कदम यांनी कंपनीबाबत नोएडा येथे जाऊन माहिती काढली.
त्यावेळी अशी कोणतीही कंपनी नसल्याचे कदम यांना समजले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाने केला. 14 ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक पेट्रोलिंग
करीत असताना पोलीस हवालदार कारखेले व मुंढे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली.
या गुन्ह्यातील एक कार ही दौंड बस स्टँड परिसरात विक्रीसाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने सापळा रचून तीन जणांना अटक केली.