पुणे

तीन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षा करता तडीपार

लोणीकाळभोर ( प्रतिनिधी – स्वप्नील कदम – 

                          येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षा करता तडीपार करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली. 

                        या संदर्भात सविस्तर माहिती देताना ते पुढे म्हणाले प्रणव भारत शिरसाठ ( वय. २०, रा. लोणी स्टेशन, आंग्रेवस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), अभिजीत अभिमन्यु आहेरकर ( २०, रा, लोणी काळभोर, ता. हवेली ) व सौरभ गोविंद इंगळे ( वय २१, रा. इराणीवस्ती, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली ) या तिघांना दोन वर्षा करता  तडीपार करण्यात आले आहे. 

                         पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरीर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या हालचालींवर नजर ठेवुन त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबतचा आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत. 

                           नव्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार यांना सदर आदेशाचे अनुषंगाने चेक करुन त्यांच्यावर कारवाई करणे बाबतच्या सुचना राजेन्द्र मोकाशी यांनी अधिकारी व अंमलदार यांना दिले होते.  त्यानुसार अभिलेखावरील गुन्हेगाराचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रणव शिरसाठ हा त्याचे साथीदार अभिजीत आहेरकर व सौरभ इंगळे यांची टोळी बनवुन वारंवार गुन्हे करीत आहे. ते लोणी काळभोर गाव व परिसरात आपल्या साथीदारांसह कोयता, कु-हाड व इतर घातक शस्त्रे जवळ बाळगुन सभ्य नागरिक, व्यापारी व इतर सर्वसामान्य लोक यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून अगर वेळप्रसंगी मारहाण करुन, त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे लुबाडतात. ते सतत एकत्रित बेकायदेशीर कृत्ये करीत असतात. त्यांची लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन परिसर म्हणजेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हददीत जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. टोळी प्रमुख सतत आपल्या साथीदारांसह धुमाकूळ घालत असतो. म्हणुन सर्वसामान्य जनतेमध्ये घबराट, भिती व मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या गुंड व दहशती कृत्यामुळे व ते सतत आपले गुंड सदस्यांसह गुन्हे करीत असलेने त्यांचेविरुध्द नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.

               राजेन्द्र मोकाशी यांनी या टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी सदरच्या प्रस्तावाची पडताळणी करुन दि. २१ ऑगस्ट रोजी प्रणव भारत शिरसाठ याच्या टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, हवालदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, गणेश भापकर, मल्हार ढमढेरे यांनी केली.