पुणे

अडीच लाखाची खंडणी उकळणारा खासगी सावकार : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने केली अटक

पुणे : (Rokhthok Maharashtra Online)

 व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करुन देखील अडीच लाखाची खंडणी उकळणारा खासगी सावकार  ज्ञानेश्वर किसन पवार (वय-42 रा. स.नं.315, वैदूवाडी, हडपसर) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या  खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर पवार विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयबहादुर रमाशंकर पांडे (वय-47 रा. एन.डी.ए. रोड, शिवणे, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडे यांनी खासगी सावकार ज्ञानेश्वर पवार याच्याकडून नोव्हेंबर 2018 मध्ये 1 लाख रुपये घेतले होते. पांडे यांनी पवारला नोव्हेंबर 2018 ते जुलै 2021 या कालावधीत रोख, ऑनलाईन, गुगल पे  व एटीएम डिपॉझिटच्या  माध्यमातून 2 लाख 90 हजार रुपये दिले आहेत. पैसे मिळाल्यानंतर देखील आरोपी पवार याने पांडे यांना वारंवार फोन करुन शिवीगाळ करत धमकावून अधीकच्या पैशांची मागणी केली.

आरोपीने फिर्यादी यांचा मानसिक छळ करुन मुद्दल रक्कम 1 लाख रुपये आणि एप्रिल 2020 ते जुलै 2020 असे चार महिन्याचे 10 टक्के प्रमाणे 40 हजार असे एकूण 1 लाख 40 हजार रुपयांची मागणी केली.
पवार याच्याकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून पांडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 384, 385,504,506 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 39, 45 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण करीत आहेत.