पुणे

पुनर्वसन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील ४३९ फ्लॅटमध्ये शिरुन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार ; हडपसर येथील शिंदे वस्तीत घडला प्रकार

पुणे  : झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील ४३९ फ्लॅटमध्ये शिरुन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील शिंदे वस्तीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी तहसीलदार विकास भालेराव (वय ४७, रा. फुलेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भालेराव हे तहसीलदार ताबा या पदावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शिंदे वस्ती येथे झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी ४ इमारती बांधल्या आहेत. त्यापैकी २ इमारतींमध्ये ४१२ घरात लोक राहायला आले आहेत. उरलेल्या दोन इमारती रिकाम्या असून त्याचे प्रवेशद्वार गेट लावून बंद आहेत. इमारत क्रमांक ए विंगमध्ये २३६ फ्लॅट आहेत. त्यापैकी २१५ फ्लॅट व बी विंगमधील २२४ फ्लॅट अशा एकूण ४३९ फ्लॅटच्या कडी कोयंडा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. या घरातील नळ, मिक्सर व शॉवर असे तब्बल १ लाख ९ हजार ७५० रुपयांचा माल चोरुन नेला. चोरीचा हा प्रकार ४ जून ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला आहे. सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी इमारतीच्या पाईपलाईनवरुन चढून लॉबीमध्ये प्रवेश केला व तेथून घरांचे कडी कोयडा तोडून बाथरुममधील फिटिंग्स चोरुन नेले. घरातील पंखे व अन्य साहित्यांना मात्र हात लावला नाही.

हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.