ठाणे

हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात ; मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात केले ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण

मुंबई : हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळअष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले होते त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या  मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या भाषणातील इतर ठळक मुद्दे

·       दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे.

·       ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळं नातं आहे.  त्यामुळेच शिवसेनेबद्दल  लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम आहे.

·       पण दुर्देवाने आज १०० टक्के राजकारण केले जात आहे.

·       कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे.

·       कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे.  त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे.

·       आज प्रताप सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत, तसे करण्याची गरज आहे . पण दुर्देवाने तेवढी प्रगल्भता  इतर काही लोकांमध्ये दिसत नाही.  आपल्या बेशिस्त वागणूकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत.

·       चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

·       अनेकजण तारीख पे तारीख जाहीर करतात, प्रत्यक्षात काही करत नाहीत पण पंधरा दिवसापूर्वी तारीख ठरवून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आमदार प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन.