पुणे

“भांडण सोडविण्यास गेलेल्या महिला सरपंचास झाली मारहाण” – कदम वाक वस्ती येथील घटना – तक्रार दाखल

कदमवाकवस्ती : स्वप्निल कदम

कदमवाकवस्ती ( ता हवेली ) येथे  लसीकरण दरम्यान झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यावसन भांडणात झाल्याने ते सोडवण्यासाठी गेलेल्या महिला सरपंच यांना शिवीगाळ करुन त्यांचे कानाखाली मारुन जमीनीवर पाडले व त्यांचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलीसांनी एकास अटक केली आहे. 

  याप्रकरणी ग्रामपंचायत कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी चित्तरंजन  गायकवाड ( वय ४०, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सुजित सुभाष काळभोर ( वय ३३, रा. कदमवाकवस्ती ) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ( ३ सप्टेंबर ) रोजी  कदमवाकवस्तीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने एंजल हायस्कुल, माळवाडी जिल्हा परिषद शाळा व कदमवस्ती जिल्हा परिषद शाळा येथे कोव्हिड – १९ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर लसीकरण सुस्थितीत पार पाडण्याकरीता सरपंच गौरी गायकवाड या एंजल हायस्कुल, संभाजीनगर, येथे उपस्थित होत्या. 

 ११ वाजण्याच्या सुमारांस सुजित काळभोर हा तेथे आला. त्यावेळी तेथे उपस्थित असणारा अविनाश उर्फ पप्पु बडदे यांच्यामध्ये  शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. सुजित काळभोर याने अविनाश यांच्या कानाखाली मारली. हे पाहून सरपंच या नात्याने त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी गायकवाड तेथे गेल्या असता त्यांनाही सुजित याने शिवीगाळ करत कानाखाली मारुन खाली जमीनीवर पाडले. त्यानंतर लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी त्याचे तावडीतुन सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना न जुमानता त्याने सरपंचांचे डाव्या हाताला धरुन जमीनीवर पाडले व मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

          सुजित काळभोर याने दिलेल्या फिर्यादी नुसार सकाळी लसीकरणासाठी गेला असता पप्पू बडदे त्याला तु थांब म्हणाला. यांवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर तेथे सरपंच गौरी गायकवाड आल्या त्यांनी कानशिलात लगावल्याने हाणामारी झाली. हे पाहून तेथे सचिन अरविंद काळभोर, महेश ज्ञानेश्वर काळभोर हे आले व सर्वांनी त्यास हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे या करत आहेत.