लोणी काळभोर ( स्वप्निल कदम ) –
पोलीसांनी दुचाकी चोरास अटक करून त्याचेकडून पंच्याऐंशी हजार रूपये किंमतीच्या ३ दुचाकी जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी ( खंडु नामदेव बेडगे, वय. ३६, रा. बोरीसलगरा, ता. जि. लातुर ) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील होणा-या वाहनचोरीस आळा घालणे व वाहनचोरी करणारे सराईत गुन्हेगार यांना पकडण्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना व पोलीस अंमलदारांना आदेश दिले आहेत.
८ सप्टेंबर रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत व राजेश दराडे हे गस्त घालत असताना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत बेडगे हा पुणे – सोलापुर महामार्गावरून एक विना नंबरप्लेटची दुचाकी भरधाव वेगात चालवीत घेऊन जात असताना दिसला. तपास पथकाने त्याचा शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. व सदर दुचाकीचे नंबर तसेच कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन सखोल तपास करता त्यांने सदरची दुचाकी लोणी रेल्वे स्टेशन येथुन चोरी केल्याचे सांगुन आणखीन दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले.
अधिक तपासात त्याने चंदननगर, वडकी व लोणी काळभोर येथुन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याचेकडुन ८५ हजार रुपये किमतीच्या ३ दुचाकी जप्त करून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील २ तर चंदननगर पोलीसचे हद्दीतील १ असें एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर, हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, राजेश दराडे, निखील पवार, बाजीराव वीर, शैलेश कुदळे यांनी केली आहे.