दौंड तालुक्यात २१ स्वातंत्र्यसैनिक आहेत. रणसंग्रामात भाग घेतला परंतू कुठेही नोंद नाही असे यापेक्षा अधिक असू शकतात. २१ जणांनी जो पराक्रम केला त्याची कुठेही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबियांपुरतीच ही माहिती उपलब्ध आहे. ही माहितीसुद्धा लिखित स्वरूपात नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या २१ योद्धांची माहिती संकलित करून ती आपल्यासमोर मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
स्वातंत्र्यसैनिक दशरथ बाळकू आबणे यांचा जन्म १६ जानेवारी १९२२ रोजी राहू येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राहू येथे झाले. स्वातंत्र्यसैनिक शिरूभाऊ लिमये हे यवतला विनायक भट यांच्याकडे आले होते. तेव्हा त्यांनी यवत येथे सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितले होते की, ग्रामीण भागात कोणाची शिक्षणाची सोय नसेल तर त्यांनी आमच्याकडे पुण्यात यावे. सभा संपल्यानंतर आबणे हे लिमये यांना भेटले. आबणे यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील आयडियल इंग्लिश स्कुलमध्ये झाले. शिक्षण चालू असताना ते शिरूभाऊ लिमये यांच्या घरी रहात होते. शिक्षण घेत असताना त्यांचा स्वातंत्र्यसैनिकांशी संपर्क आला. स्वातंत्र्यसैनिकांना जमेल तशी ते मदत करू लागले. आबणे हे स्वातंत्र्यसैनिकांची टपाली कामे करत असत. ही बाब उघड झाल्याने इंग्रजांनी त्यांना अटक केली. अटकेचा विषय शाळेपर्यंत गेल्याने संस्थेने त्यांना शाळेतून काढून टाकले. शिरूभाऊ हे त्यांचे गॅाडफादर होते.
स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा एस.एम.जोशी, शिरूभाऊ लिमये, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, किसनवीर, ना.ग.गोरे, केशवराव जेधे, वसंतदादा पाटील, काकासाहेब गाडगीळ यांच्याशी संबंध आला. भारतीय स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात कॅपिटल टॅाकीज बॅाम्बस्फोट प्रकरण खूप गाजले होते. या बॅाम्बस्फोटात सुरूंग पेरण्याचे काम दशरथ आबणे यांनी केले होते. हे बॅाम्ब आबणे यांनी केळीच्या पाटीत खाली बॅाम्ब व वर केळी ठेवून आणले होते. २४ जानेवारी १९४३ रोजी झालेल्या या स्फोटात ४ इंग्रज अधिकारी मारले गेले तर १८ जण जखमी झाले होते. बॅाम्बस्फोटानंतर ते फरारी झाली. याच गुन्ह्यात त्यांना नंतर अटक झाली होती. त्याकाळी कॅपिटल नावाने असलेले थिएटर आज व्हिक्टरी थिएटर नावाने दिमाखात उभे आहे. आबणे यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. कोणत्याही गुन्ह्याचा ते पुरावा ठेवत नसत. त्यामुळे आबणे इंग्रजांना सापडत नसत.
स्वातंत्र्यसैनिकांची टपाले काम करत असल्याने अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे पत्ते आबणे यांना माहित होते. हे इंग्रजांना समजल्यानंतर त्यांनी आबणे यांना अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये ते अटकेत होते. अनेक प्रयत्न करूनही त्यांनी इंग्रजांना पत्ते सांगितले नाही. इंग्रजांनी आबणे यांना बर्फाच्या लादीवर झोपवले पण तरीही पत्ते सांगितले नाही. अखेर इंग्रजांनी त्यांना सोडून दिले.
स्वातंत्र्यसैनिक एस.एम.जोशी यांनी त्यांना एक काम सांगितले की, स्वातंत्र्यसैनिक असलेल्या अरूणा आसफ अली यांना हैद्राबाद येथे सोडून यायचे. उंचपुरे असलेल्या आबणे यांनी पठाणी कपडे घातले. असफल्ली यांनी बुरखा घातला. दोघेही पुण्यातून कोणालाही काही संशय न येता हैद्राबाद येथे पोहचले. क्रांतीसिंह नाना पाटील हे भूमिगत असताना ते राहू येथील आबणे यांच्या घरी आले होते. स्वातंत्र्य संग्रामात आबणे विविध पत्रके काढून ते वाटायचे. त्यातून जनजागृती व्हायची. यासाठीही इंग्रजांचा त्यांच्यावर राग होता. स्वातंत्र्य संग्रामात त्यांना तीन वेळा अटक झाली होती. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर आबणे यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली. खराडी येथून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. दशरथ आबणे यांचे २४ सप्टेंबर २००५ रोजी निधन झाले.
दशरथ आबणे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनीही तुरूंगवास भोगला होता. शिरूभाऊ लिमये यांच्या पत्नी अनुताई लिमये यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महा गुजरात सत्याग्रहात लक्ष्मीबाईंनी भाग घेतला होता. त्यामुळे लक्ष्मीबाई यांना साबरमती तुरूंगात चार महिन्यांची कैद झाली होती. या सत्याग्रहात वल्लभभाई पटेल यांच्या सून भानूमती पटेल याही सहभागी झाल्या होत्या.
ही माहिती दिली आहे दशरथ आबणे यांचे चिरंजीव डॅा. रामदास आबणे यांनी. धन्यवाद डॅा. आबणे. डॅा. रामदास आबणे यांनीही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतलेला आहे. सध्या ते हडपसर येथे रहात आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे यांचे दशरथ आबणे हे चुलत आजज सासरे आहेत. दशरथ गुरुजी व लक्ष्मीबाई यांना यांना मानाचा मुजरा.
जय हिंद जय महाराष्ट्र
संकलन – रमेश वत्रे, सकाळ पत्रकार, चौफुला. मो. 9881098485