Uncategorizedपुणे

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-पुण्याचे? ; भाजपा नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याच्या अजित पवारांच्या विधानावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाजपा नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. त्यांच्या याच विधानावरुन प्रतिक्रिया देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे.

आज सकाळी पुण्यातल्या मानाच्या कसबा गणपतीचं दर्शन चंद्रकांत पाटील यांनी घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काही होत नाही. २०-२२ महिन्यांपासून हे असंच चाललंय. आमच्या एकाही आमदाराला ते हात लावू शकले नाहीत. उलट आम्ही पंढरपूर जिंकलं आता आम्ही देगलूर जिंकण्याच्या दिशेने आहोत. आणि हे परवा पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन असं बोलले. मला हे कळत नाही की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-पुण्याचे? पूर्ण कोविड काळात ते नागपूरला गेले, चंद्रपूरला गेले, गडचिरोलीला गेले, भंडाऱ्याला गेले असं कधी कळलंच नाही. त्यामुळे त्यांनी काल घोषित केलं की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली…स्वतःला किती लहान करुन घेतलं”.

ते पुढे म्हणाले, “प्रत्येकाचं आपलं प्लॅनिंग असतं, त्यामुळे ढोल वाजवण्याचं काही कारण नाही. दोन दिवसांमध्ये आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये काय करतो ते पाहा. ढोल वाजवण्याची गरज नाही. आम्हाला शांतपणे काम करण्याची सवय आहे. तुम्ही कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा, शेवटी लोकांचं मोदींवर प्रेम आहे. लोकांचं त्या नगरसेवकावर प्रेम नाही. जाणाऱ्याने विचार करावा. पुन्हा इकडे येण्याची वाट बंद आहे.”
अजित पवार म्हणाले होते की, भाजपाचे बरेच नगरसेवक संपर्कात आहेत. मी त्यांना असं सांगतो की ज्यांना कोणाला पक्षात यायचं आहे. तेव्हा, तुमचं डिस्कॉलिफिकेशन होता कामा नये. ते जर झालं तर सहा वर्षांसाठी अपात्र होतात. आता जे पक्षात आले आहेत ते अपक्ष आहेत, असं अजित पवार म्हणाले होते.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1439495576576430086?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1439495576576430086%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fpune-news%2Fbjp-chandrakant-patil-ncp-ajit-pawar-pune-pimpri-chinchwad-vsk-98-svk-88-2600369%2F