बॅंकेच्या सभासदांच्या दहावी व बारावीतील गुणवंत कन्येला दिला जाणार रोख रक्कम स्वरूपात पुरस्कार
हडपसर-
‘श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न’ पुरस्काराने साधना बँक तिच्या सभासदांच्या इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत कन्यांना सन्मानित करणार आहे. येत्या १२ डिसेंबर म्हणजे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसापासून यापुढे प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देऊन पाच गुणवंत विद्यार्थीनींचा गौरव केला जाणार आहे.बँकेचे अध्यक्ष अनिल तुपे यांनी ही माहिती दिली.
खासदार शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी साधना बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून खासदार शरद पवार यांनीही बँकेच्या या सामाजिक उपक्रमांचे स्वागत केले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साधना बँकेचे सुकाणू समिती सदस्य व आमदार चेतन तुपे, सुकाणू समिती सदस्य तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे, साधना सहकारी बँकेचे चेअरमन अनिल तुपे, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत कवडे, कार्यालयीन संचालक भाऊ तुपे आदीजण यावेळी उपस्थित होते.
साधना सहकारी बँक गेली अनेक वर्षे सभासदांच्या दहावी व बारावीतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत पाल्यांना रोख रक्कम दोन हजार रुपये देऊन गौरव करत आहे. तो उपक्रम कायम ठेवून येत्या १२ डिसेंबर पासून बँकेच्या सभासदांच्या सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दहावीतील दोन व बारावीतील तीन असा पाच विद्यार्थीनींना ‘श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात हा पुरस्कार असणार आहे.अशी माहिती साधना बँकेचे चेअरमन अनिल तुपे यांनी दिली.
…. साधना बँकेने दिला पवार साहेबांना वीस हजारांचा धनादेश
खासदार शरद पवार हे साधना सहकारी बँकेचे मान्यवर सभासद आहेत. बँकेच्या सभासदाला एकच अपत्य असल्यास साधना बँक त्या सभासदाला दहा हजार रुपये देऊन सन्मानित करते,तर एकच कन्या अपत्य असलेल्या सभासदाला वीस हजार रुपये देऊन ‘साधना कन्यारत्न’ पुरस्काराने गौरव करते.आतापर्यंत सुमारे ४० सभासद यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. बँकेचे मान्यवर सभासद असलेले खासदार शरद पवार यांनाही एकच कन्या असल्याने त्यांना आज त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन पुरस्काराचा वीस हजारांचा हा धनादेश देण्यात आला.
इमारत उदघाटनवेळी दिलेला शब्द बँकेने पाळला
साधना बँकेच्या मुख्य शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी बँकेच्या सभासदाला एका अपत्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘साधना कन्यारत्न ‘चे कौतुक केले ,तर आपणही सभासद असून या योजनेस पात्र असतानाही बँकेने मला त्याचा लाभ दिला नाही ,असे पवार साहेब मिश्कीलपणे बोलले होते. त्यांना एकच कन्या असल्याने आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘साधना कन्यारत्न ‘ चा वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यांनीही तो स्विकारल्याने मोठे समाधान वाटले.
अनिल तुपे, चेअरमन – साधना सहकारी बँक.