पुणे

चाकणच्या अन्यायकारक कररचनेला स्थगिती देण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार ; आपण चाकणच्या जनतेसोबत खासदार डॉ कोल्हे यांची स्पष्टोक्ती

चाकण – चाकण नगरपरिषदेने अन्यायकारक कररचना केली असून नागरिकांना विश्वासात न घेता केलेल्या आणि या नागरिकांचे कंबरडे मोडणाऱ्या या नवीन कररचने संदर्भात आपण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समवेत लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार आहोत. तोपर्यंत या कररचनेची अंमलबजावणी करु नये अशी निर्देश चाकणच्या मुख्याधिकारी यांना देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असून आपण याप्रश्नी चाकणच्या जनतेसोबत आहोत असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

थेट ‘ब’ वर्ग नगरपरिषद घोषित केलेल्या चाकण नगरपरिषदेने मिळकत कर सर्व्हेक्षण व कर आकारणी एकात्मिक प्रक्रियेबरोबरच करणे आवश्यक असताना सखोल विचार विनिमय न करता अवास्तव कर आकारणी केली असून या कर आकारणीला स्थगिती देण्याची मागणी विकास मंच, चाकण शहर या संघटनेच्यावतीने आज खासदार डॉ. कोल्हे यांच्याकडे केली. यावेळी मोबिन काझी, कुमार गोरे, राम गोरे, राहुल नायकोडी, विजय खाडे आदी उपस्थित होते.

या संदर्भात तातडीने लक्ष घालून खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी राजेश पाटील, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण आणि चाकणचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी संपर्क साधला. लवकरच चाकण नगरपरिषदेची निवडणूक होणार असल्याने नवनियुक्त सदस्यांना या संदर्भात निर्णय घेऊ द्या अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर या अन्यायी कररचनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार आहोत, तोपर्यंत मिळकतधारकांना दिलेल्या नोटीसांना स्थगिती द्यावी अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली.