पुणे

पुणे मनपा हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या चौतीस गावे व सर्व उपनगरातील झपाट्याने वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा… – संभाजी ब्रिगेड

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुणे हे स्मार्ट सिटी असून पुण्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. अशा पुण्याची अवस्था सध्याच्या स्थितीमध्ये बकाल होत आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे पुण्यातील झपाट्याने वाढणारे अतिक्रमण होय. मग ते गावखेड्यातील असो वा पुणे शहरातील टेकड्यांवरचे असो. पुणे शहराला सह्याद्री पर्वत रांगांचा विळखा असल्याने या टेकड्यांची लचके तोडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैद्य प्रकारची बांधकामे केली जात आहे. यामध्ये स्थानिक नगरसेवक, गाव-गुंड, भू माफिया, यांचा प्रामुख्याने मोलाचा वाटा असलेला दिसून येतो. याच गावगुंडांनी शहरातील ओढे-नाले, कॅनल या ठिकाणी दादागिरी करून अनधिकृत झोपडपट्ट्या वसवल्या आहेत. दिवसा ढवळ्या डोंगर फोडी चे प्रकार सुरू आहेत. ज्याप्रमाणे अतिक्रमण मध्ये वाढत आहे, त्याच धर्तीवर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा पुणे महानगरपालिकेकडून किंवा गावातील ग्रामपंचायतीकडून पुरविली जात नाही. जसे की त्याठिकाणी ड्रेनेज लाईन अस्तित्वात नाही त्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी पक्का रस्त्याची सोय नाही. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. लोक रस्त्याच्या कडेला येता-जाता कुठेही फेकतात. त्यामुळे त्या भागात फिरती जनावरे, कुत्रे, डुकरे, कचऱ्याची नासधूस करून या भागात दुर्गंधी पसरवतात. त्यामुळे त्या भागात अनेक साथीचे आजार पसरून लोकांना वेगवेगळ्या आजाराच्या समस्या निर्माण होतात. म्हणून वेळीच अशा प्रकारच्या बांधकामांना झपाट्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांना वेळीच अतिक्रमण विभागाने आळा घातला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. पुणे शहर व उपनगरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झालेला आहे.

सर्वसामान्य माणसं आयुष्यभराचा पैसा नवीन घर घेण्यात गुंतवतात आणि ते जर इमारत अनधिकृत असेल आणि पाडली गेली तर त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. अतिक्रमण विभाग पुणे महानगरा मध्ये मोक्याच्या ठिकाणी कारवाई करताना दिसतो, इतर ठिकाणी हे अधिकारी कारवाई का करत नाहीत.त्यांच्यावर कोणत्या नगरसेवकाचा, आमदाराचा, दबाव आहे का? हे समजत नाही. वेळीच योग्य कारवाई केली तर पुढील अनर्थ आपण टाळू शकतो.

पुणे महानगरपालिकेने टेकड्यांवर ती जैविक आरक्षण टाकलेले आहे. पुणे शहरातील तळजाई टेकडी असो, वडगाव मधील सर्व्हे. नंबर 48, 45, असो या ठिकाणी बांधकामे करण्यास परवानगी नसतानासुद्धा सर्रास जवळजवळ शंभर टक्के बांधकामे झालेली आहेत. कात्रज विभागांमध्ये धनकवडी, आंबेगाव चे पठार असेल निंबाळकर वस्ती, असेल कोंढवा मध्ये सुद्धा स्वामीनारायण मंदिरामागे मोठ्या प्रमाणात टिळक नगर म्हणून नवीन वसाहत वसवली गेली आहे. याकडे जाणूनबुजून महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. किंवा अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे येथील बिल्डरांची नगरसेवकांची आमदारांची काही आर्थिक लागेबांधे आहेत का? असाही प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. झपाट्याने वाढणारे अतिक्रमण वेळीच रोखले गेले नाही तर पुढील काळामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. वाहतूक कोंडीची समस्या असो किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न असो आर्थिक गुन्हेगारी असो पुणे शहरामध्ये राजरोसपणे दिवसाढवळ्या खून होतात चोऱ्या होतात दरोडे पडतात बलात्कार होतात याचे प्रमुख कारण म्हणजे येथील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आहे. यांना वेळीच आळा घातला पाहिजे. म्हणून अतिक्रमण विभागाने कोणालाही पाठीशी न घालता अनधिकृत बांधकामावर ती तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची प्रामुख्याने मागणी आहे.

पुणे महानगरपालिकेची 2022 ची निवडणूक पाच महिन्यांवर येऊन ठेवलेली आहे. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सपाटा चालू होतो कारण सर्व अधिकारी निवडणुकीमध्ये व्यस्त असतात त्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. म्हणून याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत बांधकामे करणारे बिल्डर्स झपाट्याने आपले कामे उरकून घेतात व लगेच त्या बांधकामांना पांढरा रंग देऊन हे बांधकाम जुने असल्याचे भासवतात. काही लोक कच्चा बांधकामामध्ये झोपडपट्टीतील लोक आणून त्यांना राहण्यास परवानगी देतात.अशा निकृष्ट दर्जाची बांधकामे ढासळतात अशा प्रकारच्या घटना पुणे शहरात घडलेल्या आहेत. बरीच लोकं बिल्डिंग खाली दाबून मेलेली आहेत कित्येक लोकांचे प्रपंच उध्वस्त झालेले आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो म्हणून निकृष्ट दर्जाचे बांधकाम वेळीच रोखले गेले पाहिजे आपल्याला खऱ्या अर्थाने पुणे शहर स्मार्ट सिटी व्हावी असं जर वाटत असेल तर अतिक्रमण विभागाने तातडीने अनधिकृत बांधकाम आवर्ती हातोडा चालविला पाहिजे कोणत्याही नगरसेवकाच्या कोणत्याही आमदाराच्या दबावाला बळी आपले काम चोख पद्धतीने बजावले पाहिजे… हीच संभाजी ब्रिगेडची प्रामाणिकपणे आपणास विनंती आहे. पुणे शहर, उपनगर व समाविष्ट 34 गावातील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करावी… अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका संबंधित कारभारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. विक्रम कुमार यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन अनधिकृत बांधकाम बाबत तक्रार करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगराध्यक्ष शिवश्री. अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री. महादेव मातेरे, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष अजय माने आदी उपस्थित होते.