पुणे

पुणे महापालिकेवर पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा झेंडा फडकवा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पुणे – आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करुन पूर्वीप्रमाणे पुणे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी झंझावती पुणे दौरा करुन विविध भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, मेळावे घेतले आणि जनसंपर्क कार्यालयाची उदघाटने केली. या भेटीतच पटोले यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी निवडणुकीचे धोरण आणि व्यूहरचना यावर चर्चा केली. या चर्चेच्या वेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, मोहन जोशी, कमलताई व्यवहारे, रोहित टिळक, अभय छाजेड, विरेंद्र किराड, संजय बालगुडे, आबा बागुल, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर आदी उपस्थित होते.

पुणे शहर हे काँग्रेसच्या राष्ट्रीय विचारांना मानणारे शहर आहे. या शहरात आपण एकत्रितपणे जिद्दीने लढलो तर पूर्वीप्रमाणेच महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवू शकू. मला खात्री आहे, पुण्याचे काँग्रेस कार्यकर्ते त्याच जिद्दीने लढतील, असे पटोले चर्चेत बोलताना म्हणाले. याखेरीज पाच वर्षातील भाजपचे अपयश आणि महापालिकेतील भ्रष्टाचार जनतेसमोर मांडावा आणि लोकांना जागृत करावे, अशा सूचनाही पटोले यांनी मांडल्या.