पुणे : सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, भाजप पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हेही स्पष्ट होत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या कुटुंबातील काही मंडळींनी मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा प्रयत्न केला. परंतु, महापौर मुरलीधर मोहोळ व इतर नेत्यांनी या वेळी या प्रवेशाबाबत हात वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुख्यात गुंड दीपक गागडे व नाना मोघे हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यापूर्वी कार्यक्रमांत दिसून आले आहेत. विशेष म्हणजे तडीपार असताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या गुंडांची उपस्थिती होती. मंगळवारीही पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या घटना पाहता चंद्रकांत पाटील पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने नेऊ पाहात आहेत, शांत पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न का करीत आहेत, भाजपकडून आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक अशा गुंड प्रवृत्तीवरच लढवली जाणार आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुणे शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे.
तसेच, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलादी हातांनी पुण्याची गुंडगिरी मोडून काढा, अशी गर्जना केली होती. त्याचे काय झाले? या गर्जनेचा भाजपला विसर पडला आहे का? जे प्रदेशाध्यक्ष या गुंडगिरीला बळ देत आहेत, त्यांना पुण्याची शांतता भंग होऊ देऊ नका, हे सांगण्याचे फडणवीस यांचे धारिष्ट्य नाही का, असा आमचा सवाल आहे.
पुण्याची ओळख ही सुसंस्कृत शहर म्हणून आहे. ती तशीच राहू देण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. शहराच्या विकासाच्या प्रश्नांपासून पळ काढणारे चंद्रकांत पाटील यांनी निदान पुण्याची संस्कृती बिघडू न देण्याच्या जबाबदारीपासून तरी पळ काढू नये, हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही चंद्रकांत पाटील यांना सांगू इच्छितो.