Uncategorized

गाणारे व्हायोलिन मूक झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना श्रध्दांजली

      मुंबई

   प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

         व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे.
गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले. त्यांच्या व्हायोलिनचे सूर आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढ्यांसाठी राहिली आहे. संगीत क्षेत्रातील सच्चा साधक कसा असावा याचे प्रभाकर जोग आदर्श होते. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

“ज्येष्ठ संगीतकार, प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या निधनानं भारतीय संगीतातील महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या व्हायोलिन वादनानं गानरसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मनमुराद आनंद दिला. स्वर्गीय सुधीर फडके तथा बाबूजींच्या ‘गीतरामायणा’तील गाण्यांना त्यांच्या व्हायोलिनची समर्थ साथ लाभली होती. व्हायोलिनला गायला लावण्याची किमया लाभलेले ते जादूगार होते. त्यांचं निधन ही राज्याच्या संगीत, कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.