पुणे

उद्योग,व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्यावतीने गौरव सोहळा

पुणे 

उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करण्यासोबतच उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

येरवडा येथे मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्यावतीने कोरोना कालावधीत तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मराठा आंत्रप्रिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश आसबे, सचिव सागर तुपे, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे, असे सांगून श्री. थोरात म्हणाले, सहकार क्षेत्रामुळे बँकिंग, सहकारी साखर कारखाने, दुधसंघ, पतसंस्थाचे जाळे ग्रामीण भागात वाढले त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था सुधारली आहे. त्याप्रमाणे उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही अशीच प्रगती व्हावी यासाठी या क्षेत्रात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक परवान्याची संख्या तसेच इतरही बाबतीत सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही श्री. थोरात यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून काम सुरू आहे. ऑनलाईन सातबारा, ऑनलाइन फेरफार, ई-पीक पाहणी याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी शासन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर,मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.