पुणे

सन्मित्र सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा सुवर्णमहोत्सवी वर्षात एक हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा मानस – बाळासाहेब शिवरकर

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन )
हडपसर : शेतकऱ्यांसह जनसामान्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी राज्यातील सहकार चळवळीचे योगदान महत्वपूर्ण आहे. ही चळवळ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत रूजविण्यात सन्मित्र बँकेने गेली पन्नास वर्षात आटोकाट प्रयत्न केले आहेत. बँकेच्या विस्ताराबरोबरच अनेक गरजूंना अर्थसाह्य करुन त्यांच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे काम या काळात झाले आहे. सध्या बँकेने चारश कोटी रुपयांची उलाढाल केली असून या सुवर्णमहोत्सवी वर्षात एक हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा मानस आहे. सेवक व संचालकांच्या माध्यमातून हा संकल्प निश्चितपणे पूर्णत्वास जाईल, असा विश्वास बँकेचे मार्गदर्शक व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केला.

येथील सन्मित्र सहकारी बँक यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. बँकेचे संचालक व सेवकांचा स्नेह मेळावा आयोजित करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. बँकेच्या शहर व जिल्हा परिसरात आठ शाखा आहेत. त्यानिमित्ताने त्यातील या आर्थिक अर्धवर्षात सर्वाधिक सुमारे पंधरा कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या गुरुवार पेठ शाखेला उत्कृष्ठ शाखेचा पुरस्कार जाहीर करीत कमिटी चेअरमेन लक्ष्मण कोद्रे व शाखा व्यवस्थापक संजय हिंगणे यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून यावेळी गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री शिवरकर बोलत होते.

चेअरमन सुनिल गायकवाड, व्हाईस चेअरमन भरतलाल धर्मावत, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने, ज्येष्ठ संचालक प्रा. चंद्रकांत ससाणे, यशवंत साळुंखे, सुदामराव जांभुळकर, संजय शेवाळे, जयसिंग गोंधळे, रमेश काकडे, गणेश फुलारे, लक्ष्मण कोद्रे, दिलीप टकले, प्रशांत तुपे, संभाजी हाके, अभिजित शिवरकर, शुभांगी कोद्रे, रेश्मा हिंगणे, ॲड. विजय राऊत, चंद्रकांत तोंडारे, व्यवस्थापन कमिटीचे चेअरमन ॲड. चेतन शेवाळे, अजय गिरमे, किशोर शिंदे, तसेच ॲड. प्रभाकर शेवाळे, सदानंद कोद्रे, विक्रम शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

सभासदांना दहा टक्के लाभांश तर सेवकांना दिपावली निमित्त दहा टक्के बोनस देण्यात आला असल्याचे यावेळी चेअरमन सुनील गायकवाड यांनी सांगितले. गणेश फुलारे यांनी सूत्रसंचालन केले तर व्हाईस चेअरमन भरतलाल धर्मावत यांनी आभार मानले.