पुणे

डॉ. सी. तु. तथा दादा गुजर पुरस्कार डॉ. बेलखोडे व बापटले यांना जाहीर

हडपसर/ पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. किनवट, जि. नांदेड येथील डॉ. अशोक बेलखोडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी तर लातूर येथील रवि बापटले यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव अनिल गुजर यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे संस्थापक समाजसेवक डॉ. सी. तु. तथा दादा गुजर यांच्या नावाने सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतात. डॉ. अशोक बेलखोडे नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या आदिवासी, बंजारा-बाहुल भागात आरोग्य सेवा पुरवण्याचे बहुमोल कार्य करीत आहेत.

त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी गौरविण्यात येणार आहे. रवि बापटले एचआयव्ही बाधित व समाजाने बहिष्कृत केलेल्या लोकांसाठी मोलाचे योगदान देत आहेत. त्यांनी लातूर येथे या घटकातील व्यक्तींसाठी “हॅप्पी इंडियन व्हिलेज’ ची उभारणी केली आहे. त्यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी गौरविण्यात येणार आहे.

हे पुरस्कार डॉ. गुजर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव, गुजर यांनी सांगितले.