पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो तसेच शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने जे नियम पायदळी तुडवले आहेत, पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, त्याकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. याचे उत्तर भाजपने पुणेकरांना देण्याची गरज आहे.
पुणे महानगरपालिका परिसरात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने महानगरपालिका परिसरात, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, महानगरपालिका इमारतीच्या चारही बाजूला होर्डिंग्स लावून या परिसराचे विद्रुपीकरण करण्याचे काम केले आहे. ज्या महानगरपालिकेत सत्तेत आहोत, त्या परिसरातील विद्रुपीकरण रोखणे तर दूरच उलट स्वत:च विद्रुपीकरण करण्यातच धन्यता मानणारा भाजप शहरातील विद्रुपीकरण कसे रोखणार, हा खरा पुणेकरांचा प्रश्न आहे. तसेच, भाजपकडून आपल्या परिसराचे विद्रुपीकरण केले जात असताना महानगरपालिका आयुक्त व प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असतील, तर यावरून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपची दादागिरी आपल्या सहज लक्षात आल्याशिवाय राहत नाही. याबाबत ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपने थोडे अंतरंगात डोकावून पाहण्याची गरज आहे.
तसेच, देशातील विविध राज्यांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात या नव्या व्हेरिएंटची धास्ती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हा व्हेरिएंट राज्यात प्रवेश करू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही निर्बंध घातले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीत भाजपने हा कार्यक्रम घेत एकप्रकारे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचाच प्रयत्न केला आहे. किंबहुना हा नवा व्हेरिएंट पुण्यात प्रवेश करणार नाही, याचे स्वप्न भाजप नेत्यांना पडले असावे, त्यामुळेच त्यांची वर्तणूक अशी बेफिकीरीची दिसून येत आहे. आधीच पुणेकरांना कोरोनामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला असताना भाजप नेत्यांनी आपण या संकटात भर का टाकत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. ईश्वर भाजप नेत्यांना असा विचार करण्याची सद्बुद्धी देवो, एवढीच प्रार्थना. असा टोला प्रशांत जगताप यांनी मारला आहे.