मंबई शहर

विवाहित महिलेला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात,अश्लील विडिओ बनवून केली लाखोंची वसुली..

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

 मुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील नवऱ्यापासून वेगळं राहणाऱ्या एका महिला उद्योजिकेला तिच्या प्रियकरानं लाखो रुपयांना लुबाडलं आहे. आरोपीनं पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ पतीला पाठवण्याची धमकी देऊन पीडितेकडून वेळोवेळी ४ लाख रुपये वसूल केले आहेत. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने संबंधित व्हिडीओ पीडित महिलेच्या पतीला पाठवून ५ लाखांची मागणी केली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेनं आरे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला दिल्लीतील कमला विहार येथून अटक केली आहे. कृष्णकांत अखोरी असं अटक केलेल्या २५ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. मागील काही वर्षांपासून आरोपी पीडितेचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उद्योजिका आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरातील रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून तिचं आपल्या पतीसोबत पटत नसल्याने ती पतीपासून वेगळं राहत होती. दरम्यान २०१६ साली पीडित महिला बिहारमध्ये एका व्यक्तिमत्व विकास सेमिनारसाठी गेली होती.यावेळी तिची ओळख २५ वर्षीय आरोपी कृष्णकांत अखोरी याच्यासोबत झाली होती. कालांतराने दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं होतं. पतीपासून वेगळं राहणाऱ्या महिलेला आरोपीनं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत अनेकदा लैंगिक संबंध ठेवले. तसेच शरीर संबंध ठेवतानाचे अनेक व्हिडीओही आरोपीनं आपल्या मोबाइलमध्ये काढले. पण काही वर्षानंतर पीडित महिला आपल्या पतीसोबत पुन्हा एकत्र राहू लागली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीनं संबंधित व्हिडीओ पतीला पाठवण्याची धमकी देत पीडितेकडून वेळोवेळी चार लाख रुपये वसूल केले.यानंतरही आरोपी पीडितेकडे लैंगिक संबंधाची मागणी करत होता. पीडितेनं नकार दिल्यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ पीडितेच्या पतीला पाठवून ५ लाखांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीनं दिली. या प्रकारनंतर पीडितेनं आरे पोलीस ठाण्यात प्रियकर कृष्णकांत अखोरी याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.