पुणे दि.१०- वैद्यकीय क्षेत्रातील बदल स्विकारण्यासोबतच वैद्यकीय शिक्षण विभागात आमुलाग्र बदलासाठी सर्व मिळून समन्वयाने काम करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, ससूनचे अधीष्ठाता डॉ. विनायक काळे, डॉ. मुरलीधर तांबे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने केलेले काम कौतुकास्पद आहे. कोरोनाचा धोका अजुनही टळलेला नाही, त्यामुळे यापुढील काळातही आपल्याला खबरदारी घेत आरोग्य यंत्रणेसह सज्ज रहावे लागणार आहे. ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक असून एकत्रित प्रयत्नाने कोरोनावर पुर्णपणे मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यापुढेही अडचणीतून तत्परतेने मार्ग काढण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. वैद्यकीय सेवांचा दर्जा कायम राखला जावा, तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा देण्यासाठी काम करावे, असेही ते म्हणाले.
कोरोना उपाययोजना, ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, फायरसेप्टी, सुरक्षा यंत्रणा, उपलब्ध मनुष्यबळ, उपचार सुविधा, उपचारासाठीचे विमाकवच, लसीकरण आदींचाही श्री देशमुख यांनी आढावा घेतला.
यावेळी पुणे विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांनी सादरीकरणाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत माहिती दिली.
यावेळी बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागप्रमुखांसह पुणे विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख अधिष्ठाता उपस्थित होते.