हवेली प्रतिनिधी :-अमन शेख
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे एका तृतीयपंथीयाचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. तृतीयपंथीयाचा खून करुन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आशु उर्फ आनिश रामानंद यादव ( सध्या रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. धर्मु जोडीतराम ठाकुर (वय-20), युगल लालसिंग ठाकुर (वय 19 सध्या दोघे रा. साकोरे हॉस्पिटलमागे, बजरंगवाडी शिक्रापूर मूळ रा. ढाबा, ता. डोंगरगाव जि. राजनंदगाव, राज्य छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अनिता सोमनाथ सासवडे (रा. बजरंगवाडी शिक्रापुर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथील एक हॉटेल समोरील मोकळ्या जागेत तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींची माहिती मिळाली. आरोपींचा शोध घेत असताना दोघेही छत्तीसगढ येथे पळून जाण्याच्या तयारीत असून शिक्रापूर-चाकण चौकाकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिक्रापुर-चाकण चौकाच्या परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आणि मयत हे तिघे दारु पित बसले होते. त्यावेळी धर्मु ठाकूर याने मयत तृतीयपंथी आशु याच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पैशाच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून दोघांनी तृतीयपंथीय आशुचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पथक करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे सहायक पोलीस फौजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीण, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, चेतन पाटील यांच्या पथकाने केली.