नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचं दिसून येत आहे. पुण्यात अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक ओपन चॅलेंज दिलं होतं. यानंतर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमित शहांना प्रत्युत्तर दिलं. यासोबतच अमित शहा यांना काही सवाल केले आहेत.
संजय राऊत म्हणाले, ते असं म्हणत आहेत की, राजीनामा द्या आणि वेगळे लढून दाखवा. 2014 साली आम्ही वेगळेच लढलो होतो. प्रचंड ताकद, पैसा, केंद्रीय सत्ता याची लाट असतानाही आम्ही लढलो आणि आम्ही विजयी झालो.
कटकारस्थान कोणी केलं?
2014 पासून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण? याचं उत्तर त्यांनी द्यावं. 2014 साली हिंदुत्ववादी पक्षाला दूर ठेवा म्हणून कोणी कटकारस्थान केलं याचं उत्तर द्यावं. पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत उत्तर द्यावं असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने कधी सोडला नाही आणि सोडणारही नाही. 2014 साली आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना सत्तेसाठी.. फक्त सत्तेसाठी आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा असं राज्यातील भाजप नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते? हे अमित शहांनी स्पष्ट करावं.
तीन चिलखतं दूर करा आणि लढा
महाराष्ट्राचं सरकार उत्तम चाललं आहे. केंद्राने प्रयत्न करुन सुद्धा सरकारचं एक कवचा सुद्धा उडालेला नाहीये याचं दु:ख आम्ही समजू शकतो. तुमच्या संपूर्ण यंत्रणा फेल गेल्या आहेत. आपण जे म्हणताय ना राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा… तुम्ही जी तीन-तीन चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय ना? सीबीआय, ईडी आणि एनसीबी ही तीन चिलखतं घालून तुम्ही आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताय ना… ही चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत आम्ही पाठीमागून हल्ले करत नाही. आम्ही समोरूनच लढतो आणि आत्तापर्यंत समोरुनच लढत आलो आहोत असंही संजय राऊत म्हणाले.
भाजपचं हे वैफल्य मी राज्यातील नेत्यांमध्ये पाहतोय, पण त्यांचे सर्वोच्च केंद्रीय नेतेही महाराष्ट्रात येऊन त्याच वैफल्यातून बोलत आहेत. हे जेव्हा मी पाहिले तेव्हा मी, मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारचे नेते या सर्वांना त्यांची दया आली आणि आश्चर्यही वाटलं असंही संजय राऊत म्हणाले.