स्वप्नील कदम
चाकण : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात तरुण-तरुणीने एकत्र झाडाला गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तरुण बेशुद्ध झाला आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती चाकण पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आणि तरुणी हे मुळचे जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत. दोघांनी पुण्यातील चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथील एका शेतात गळफास घेतला आहे. संबंधित दोघांनी शेतीच्या बांधावरील एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला आहे. या दुर्दैवी घटनेत गळफास बसून तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संबंधित तरुण बेशुद्ध झाला आहे.स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती चाकण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तरुणाला तातडीने पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केलं आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.संबंधित तरुण तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आणि ते जुन्नरमधून नेमकं कशासाठी पुण्यात आले होते? याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. संबंधित दोघांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.