पुणे

पोलीस हवालदाराला दोन हजाराची लाच घेताना केली अटक

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

पुणे : पुणे शहरातील चंदननगर येथील एका पोलीस हवालदाराला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. अनिल निवृत्ती होळकर (वय ५२) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एक २३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्याद व्यक्तीने एका महिलेस ५० हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे पुन्हा महिलेकडून मिळत नसल्याने फिर्यादीने पोलीस हवालदार होळकर यांच्याकडे तकार दिली. मात्र, होळकर यांनी यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्याप्रमाणे फिर्यादीने दिलेली २ हजार रुपये रक्कम घेताना होळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ नुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.