पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून केवळ भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच एरवी विकासकामांसाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी मात्र महानगरपालिकेची तिजोरी ओसंडून वाहत आहे. कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल आपण सर्वांनीच बाघितले आहेत. जम्बो कोविड हॉस्पिटल व इतर सुविधांची पुणेकरांना नितांत आवश्यकता असताना पैसेच नाही असं रडगाणं सत्ताधारी भाजपने मांडलं. कोरोनाच्या भयावह संकटात पुणे शहरातील तब्बल ९११४ नागरिकांनी आपले प्राण गमावले. मात्र कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सामान्य पुणेकरांच्या हक्काच्या निधीस हात घातला आहे. या माध्यमातून आपल्या काही हितचिंतकांचा आर्थिक फायदा व्हावा हाच भाजपचा डाव आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्वार्थासाठी पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधार्यांनी दरोडा टाकला असून याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आज तीव्र आंदोलन करण्यात आले. “पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीसह पुणे शहराचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास व पुणे शहराने केलेली प्रगती जगासमोर मांडली होती. भारतीय जनता पक्षाच्या काळात तयार झालेल्या कॉफी टेबल बुकमध्ये मात्र कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल जगासमोर मांडले जाणार आहेत. पुणे शहराच्या इतिहासातील एक काळा अध्याय कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉ. आशिष भारती ( आरोग्य प्रमुख )यांना निवेदन दिले आहे, तसेच या निविदेची चौकशी करण्यासाठी नगरविकास विभाग, गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीआयडी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे.” अशी भूमिका यावेळी श्री. प्रशांत जगताप यांनी मांडली. “गली गली में शोर है, भाजपा चोर है”, “भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो” अशा घोषणांनी पुणे महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष श्री. रविंद्रआण्णा माळवदकर, विरोधीपक्षनेत्या सौ. दिपाली धुमाळ, नगरसेवक श्री. महेंद्र पठारे, नगरसेविका सौ. रेखा टिंगरे,स्मिता कोंढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.