प्रतिनीधी: स्वप्नील कदम
लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट येथून पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. राज रविंद्र पवार (वय २४, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राज पवार याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि मुंबई पोलीस कायदा कलम १४२ सह क्रिमीनल लॉ अॅमेडमेट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज पवारला परिमंडळ ५ च्या पोलीस उप-आयुक्त यांच्या आदेशान्वये डिसेंबर २०२१ पासुन ०२ वर्षाकरिता पुणे जिल्ह्याच्या हददीतुन तडीपार करण्यात आले होते. परंतु, आरोपी राज पवार हा तडीपार असतानादेखील कवडीपाट व परिसरात हातात कोयता घेवून दहशत पसरवत आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर व त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या. सदर पथकाने आरोपी राजला कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट येथून पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपी राजची पोलिसांनी अंगझडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे एक कोयता आढळून आला.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंके, राजेश दराडे, आणि बाजीराव विर यांच्या पथकाने केली आहे.