हवेली प्रतिनिधी – अमन शेख
महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीलंकेमधून अयोध्येच्या दिशेने निघालेल्या सीतामाईंच्या पादुका शुक्रवारी (दि. ११) लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणार आहेत. या पादुकांची गावकऱ्यांच्या वतीने लोणी काळभोर फाटा ते तीर्थक्षेत्र
रामदरा अशी ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली. रावण वधानंतर श्रीलंकेचा कारभार रावणाचे बंधू बिभीषण पहात होते. त्या वेळी सीतामाईंनी या पादुका तेथे ठेवल्या होत्या. भारत सरकारच्या मागणीनुसार श्रीलंका सरकारने या पादुका भारताला दिल्या आहेत. रामनवमीच्या दिवशी या पादुकांची अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्रभू रामचंद्र व सीतामाई वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले होते. त्या सर्व ठिकाणी या पादुका नेहण्यात येणार आहेत. शुक्रवारी (दि. ११) दुपारी १२ वाजता लोणी काळभोर फाटा ते तीर्थक्षेत्र रामदरा अशी ढोल ताशांच्या गजरात पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी यावेळी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी केले आहे.