हवेली प्रतिनिधी – अमन शेख
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाची विद्यार्थी सेहनाज शेख हिने सॅन्डी जॉयल आणि जॉयव एंटरटेंमेंट तर्फे आयोजित मिस युनिव्हर्स आशिया 2022 हा किताब नुकताच जिंकला. तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक प्रश्न-उत्तर आणि चर्चा आणि सामान्य प्रश्नोत्तरांसह तिने टॉप पाचमध्ये मजल मारत जेतेपद आपल्या नावावर केले.
विद्यार्थ्यीनी सेहनाज शेख हिच्या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजच्या अधिष्ठाता डॉ. आसावरी भावे आणि स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले
सेहनाझ ओरिसातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. ती एमाआयटी स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज येथे बीए (ऑनर्स) इंग्रजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. कठोर परिश्रम चालु घडामोडींचे भान, नवीन आव्हाने पेलण्यास सक्षम असणे यावर यश अवलंबून असते. सादरीकरण कला, व्यक्तिमत्व विकास, विनोद, सौंदर्य, आरोग्य आणि हुशार विचार अशा अनेक गुणांचा आणि कौशल्यांचा या स्पर्धेत विचार केला जातो.
एमआयटी एडीटी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. अनेक विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास आणि इतर क्षेत्रासाठीचे मार्गदर्शन केले जाते. यातून प्रेरित होऊन विद्यार्थी स्वत:चा सर्वांगीण विकास करतात आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवर स्वतःला सादर करून विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालतात, अशी भावना प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केली.