पुणे

मतदारांनी मला बुजगावणे म्हणून विधानसभेत पाठवले नाही – हडपसर कचरा प्रकल्पावर आमदार चेतन तुपे आक्रमक

 

पुणे : (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)

हडपसरमधील मतदारांनी मला बुजगावणे म्हणून विधानसभेत पाठवले नाही. काम करणारा, बोलणारा आमदार म्हणून त्यांनी निवडले असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी कचऱ्याच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. हडपसर मतदरसंघ हाच एक कचरा कुंडी होत आहे. ओढे-नाले, बंधारेही कचऱ्यात अडकल्याकडे लक्ष वेधून, चेतन तुपे पाटील यांनी पुण्यातील कचऱ्याचे फोटो विधिमंडळात दाखविले. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. गंमत म्हणजे, ‘मी बुजगावणे नसल्याचे स्पष्ट करताना चेतन तुपे पाटील यांनी भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही टोला लगावला आहे.

दुसरीकडे, पुणे शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांची माहिती देऊन, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी खुलासा केला. मात्र, पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खोटे आकडे दिल्याचा आरोप करून चेतन यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्याची कोंडी केली. अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात चेतन तुपे पाटील यांनी विधानसभेत कचऱ्याच्या मुद्यावरून सभागृहाचे लक्ष वेधले. शहरातील कचरा हडपसरमध्ये आणून तिथेच प्रकल्प उभारले जात आहे. पाटबंधारे खात्याच्या जागांवर पडलेला टाकून तो उचल्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

त्यावर बनसोडे यांनी उत्तर दिले. कचऱ्याच्या प्रक्रियेबाबतची माहिती त्यांनी मांडली. ही माहिती मंत्र्यांचे समाधान करणारी असली तरी तरी पुणे महापालिकेचे अधिकारी दिशाभूल करीत असल्याचे चेतन यांनी सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या चेतन यांनी मला बुजगावणे म्हणून लोकांनी इथे पाठविले नसल्याचे सांगितले. “हडपसरमध्ये कचरा प्रकल्प उभारून रहिवाशांना कचरा कुंडीतच राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यातून रहिवाशांची सुटका करावी. त्यासाठी प्रभावीपणे उपाय करून त्याची अंमलबजावणी व्हावी, असेही तुपे पाटील म्हणाले.

यावर बनसोडे यांनी उत्तर दिले. ‘पुणे शहराची लोकसंख्या आणि वाढलेल्या क्षेत्रामुळे दररोज सुमारे सव्वादोन हजार टन कचरा जमा होतो. त्यातील पावणेदोन हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याची सूचना केली आहे. दरम्यान, पुण्यातील विद्यार्थीवर झालेल्या हल्ल्यावरूनही तुपे पाटील यांनी प्रश्न उपस्थितीत केला.

आज विधानसभेमध्ये आमदार चेतन तुपे यांनी कचऱ्याचा प्रश्न त्यामुळे हडपसर मधील नागरिकांवर होणारा अन्याय अतिशय तडफेने मांडला व प्रश्नावर न बोललेले माजी आमदार योगेश टिळेकर यांना बुजगावणे म्हणून उपरोधिक टोला लगावला