हवेली तालुका प्रतिनिधी:-अमन शेख
विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या पुणे पोलिसांच्या लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई प्रशांत मधुकर गायकवाड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी काढले आहेत.
प्रशांत गायकवाड हे जून 2021 पासून गैरहजर आहेत. त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडून वेळोवेळी कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र प्रशांत गायकवाड हे कामावर हजर झाले नाहीत. यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतरही गायकवाड हे कामावर हजर झाले नाहीत. गायकवाड त्यांचे गैरवर्तन पोलीस दलातील इतर कर्मचारी यांच्यावर होऊन पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा निर्माण करणारे असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.प्रशांत गायकवाड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक यांच्या कडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.