प्रतिनिधी: स्वप्नील कदम
लोणी काळभोर : सोरतापवाडी येथील कोरेगांव मुळ ( ता. हवेली ) येथे वीजवाहक तारेला हात लागल्याने तमाशा कलाकारांची वाहतूक करणा-या परप्रांतीय बस चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेत जितेंद्र राधिकाप्रसाद पांडे ( वय ३२, सध्या रा. ईश्वरनगर, वाशी, बेलापूर रोड, ठाणे वेस्ट, मुंबई. मुळ रा. रामवापूर, ता. सिद्धार्थनगर, झकौहर बजार, उत्तर प्रदेश ) हे मृत्यूमुखी पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोरेगांव मुळ गावच्या ग्रामदैवताच्या वार्षिक उत्सवासाठी किरणकुमार ढवळीपुरकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर तमाशाच्या कलाकारांना गावोगावी पोहचवण्यासाठी मुंबई येथील आश्विनी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस भाडेतत्वावर ठरविण्यात आली होती. सदर बसवर जितेंद्र हे चालक म्हणून कार्यरत होते.
९ एप्रिल रोजी टाकळी ढाकेश्वर ( ता. पारनेर ) येथील कार्यक्रम करून सर्व कलाकार लक्झरीने कोरेगाव मुळ येथे पोहोचले होते. सदर बस ग्रामपंचायत कार्यालया नजीकच्या मोकळ्या मैदानात उभी करण्यात आली होती. तिच्या वरून गावाला विद्युतपुरवठा करणा-या विद्युतभारीत तारा गेल्या होत्या. मध्यरात्री १.५५ वाजण्याच्या सुमारांस जितेंद्र समवेत तमाशा व्यवस्थापक किरण गायकवाड, सुदेश शिमाणे, दिपक ससाणे व इतर कलाकार लक्झरीवर झोपण्यासाठी बसजवळ आले. सर्वजण गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी जितेंद्र हे लक्झरीचे मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीचे सहाय्याने वर गेले.
रात्रीच्या अंधारात त्यांना लक्झरीवरून गेलेली विद्युतभारीत तार दिसली नाही. पुढील बाजूला जात असताना त्यांचा हात तारेला लागल्याने शॉक लागून ते खाली पडले. यामुळे आरडाओरडा झाला. गायकवाड व इतर सहका-यांनी त्यांना पाहिले त्यावेळी त्यांची हालचाल मंदावली होती. उपचारासाठी त्यांना उरूळी कांचन येथील सिद्धिविनायक रूग्णालयात नेले. तत्पूर्वी ते मयत झाले होते. तब्बल दोन वर्षानंतर यात्रा जत्रा भरण्यास सुरुवात झाली असल्याने तमाशा कलावंत व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना चांगले दिवस येऊ लागल्याने सर्वजण आनंदात होते. या घटनेमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.