सहा गुन्हे उघड, चार लाख रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
पुणे : शहरामध्ये सिनेस्टाईलने चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या गुन्हे शाखेा युनिट-5ने मुसक्या आवळल्या. आरोपीकडून सहा गुन्हे उघडकीस आणले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संजय रामब्रिज सहाणी (वय – 21 रा. मु. पो. गोहारपुर, ठाणा पुरंदरपुर, ता. नौतनवा, जि. महाराजगंज उत्तर प्रदेश) आणि दिपककुमार अभय सिंग (वय – 21 रा. मु. पो. मोदागोल वस्ती, सितामढी, बिहार, सध्या रा. होळकरवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट-5चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी होळकरवाडी येथे राहणाऱ्या दोघांनी पल्सर गाडी चोरली असून, गाडीची पुढील नंबर प्लेट काढून मंतरवाडी भागात फिरत असल्याची माहिती सूत्रांकूडन मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंतरवाडी भागात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी हडपसर भागात दोन चैन स्नॅचिंग, एक बॅग लिफ्टिंग व तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे प्रत्येक वर्षी नवीन राज्यात जाऊन पहिल्यांदा त्या ठिकाणी मिळेल ते काम करत होते. काम करत असताना त्या भागाची पाहणी करत होते. त्यानंतर आरोपी गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, विनोद शिवले, चेतन चव्हाण यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.