हडपसर

मेट्रो धावणार., हडपसरच्याही पुढे., शिवाजीनगर ते लोणीकाळभोरपर्यंत मार्ग प्रस्तावित

प्रतिनीधी स्वप्नील कदम

लोणी काळभोर -शिवाजीनगर ते हडपसरऐवजी लोणी काळभोरपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बैठकीत घेण्यात आला आहे.

यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर पहिल्या टप्प्यातील काम झाल्यावर ही मेट्रो पुढे शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत नेल्यास दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांत कामानिमित्त प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्‍न सुटणार आहे.

पुणे-सोलापूर मार्गावर हडपसर, मुंढवा, वानवडी, फातिमानगर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर आणि उरुळी कांचन परिसराचे नागरिकण मोठ्या वेगाने होत आहे. या परिसरातून दररोज हजारो नागरिक शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करतात. त्यामुळे पुणे-सोलापूर महामर्गावर मोठी वर्दळ असते. या पार्श्‍वभूमीवर हिंजवडी ते शिवाजीनगरला येणारा मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत वाढविल्यास पुणे-सोलापूर मार्गावरील या टप्यात होणारी वाहतूक कोंडी कायम स्वरूपी सुटेल, या मुळे सदर मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.हडपसर, मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, आळंदी म्हातोबा, सोरतापवाडी, उरुळी कांचन या भागात लोकसंख्या वाढीचा वेग मोठा आहे. याच कारणातून पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढत आहे. भविष्यात वाहतुकीचे प्रमाण वाढून हा प्रश्‍न बिकट होऊ शकतो, यावर पर्याय म्हणून मेट्रो सुरू होणे गरजेचे असल्याचे या भागातील नागरिकांचेही
म्हणणे आहे.

…निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत
हडपसर ते लोणी काळभोर दरम्यान असलेल्या मांजरी येथील बाजार समिती, महामार्गालगत असलेली अनेक मोठी मंगल कार्यालये, हॉटेल आणि ढाबे यामुळे पुुणे-सोलापूर महामार्गावर कायमच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करीत असलेले प्रवासी, स्थानिक नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना दररोज वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. यावर मेट्रो हा सर्वोत्तम पर्याय असल्याने या निर्णयाचे नारिकांकडून स्वागत होत आहे.