पुणे

तब्बल ३० वर्षानंतर मांजरीच्या विद्यार्थ्यांची सोशल मीडियामुळे भेट….. अन मित्र – मैत्रिणी भेटून झाले भावुक

शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते मांजरी येथील के.के घुले विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे.
१९९१ ~ १९९२ मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचा मेळावा रविवारी महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून पुणे सोलापूर रोडवरील दख्खन वाडा येथे आयोजित करण्यात आला होता. शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, शिक्षण,औद्योगिक, सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी त्या क्षेत्रात कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सकाळी ११ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. तब्बल ३० वर्षांनी विद्यार्थी एकमेकांना भेटले. ६० माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या स्नेह मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. काही माजी विद्यार्थ्यांचे निधन झाले होते.त्यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरवात झाली.सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय करून दिला.शालेय जीवनातील काही गमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला.त्यानंतर स्नेह भोजन व फोटोसेशन झाले.अनेकजण हे आनंदी क्षण आपल्या कॅमेर्‍यात टिपत होते.या आनंदयात्री सोहळ्यात सर्वच जण हरखून गेले होते.
अनेक विद्यार्थीनी पुण्याच्या बाहेरील असूनही त्या या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्याथ्यार्ंनी व्यक्त केली.