पुणे

लोणी काळभोर रेल्वेस्थानकात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

लोणी काळभोर रेल्वेस्थानकात झालेल्या वेगवेगळ्या रेल्वेच्या दोन अपघातांत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये चंद्रकांत शनेश्वर चव्हाण (अंदाजे वय ६०, राहिंजवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) आणि राम पुकार (वय २२, रा. बिहार) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत चव्हाण हे मंगळवारी (दि. २४) सकाळी साडेआठच्या सुमारास लोणी स्टेशन येथील रेल्वेलाइन ओलांडत होते. तेव्हा दौंडकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसने चव्हाण यांना धडक दिली. या अपघातात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना घडलेली असतानाच हैद्राबाद एक्स्प्रेसच्या पाठीमागून पुण्याच्या दिशेने सकाळी नऊच्या सुमारास चाललेल्या जेसीडी एक्स्प्रेसच्या दरवाजामधून राम पुकार हा खाली पडला. त्याचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत चव्हाण हे लोणी काळभोर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होते. तर, राम पुकार हा एक मजूर असून तो पुण्याला कामासाठी आला होता.