पुणे दि.३- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकराणाचे वाटप तसेच अग्निशमन दूचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले.
कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष
शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहाद्वारे प्राप्त होणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून शहराच्या विकासात भर घालण्यासाठी समन्वय साधण्याचे कार्य या कक्षामार्फत करण्यात येईल. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण प्रकल्पाद्वारे शहराचा शाश्वत विकासासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
महानगरपालिकेचे विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कल्याणकारी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच उद्योग समूहाचा या कामात सहभाग वाढविण्याकरिता सामाजिक उत्तरदायित्व कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. कक्षाच्या माध्यमातून खाजगी संस्था तसेच महानगरपालिका यांना एकत्रित आणून नव्या योजना, कल्पना, कार्यक्रम इत्यादींची आखणी आणि त्यांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.
उद्योग सुविधा कक्ष वैशिष्ट्ये
शासकीय संस्था आणि उद्योग यांच्यातील संवाद सुनिश्चित करण्याचा उद्योग सुविधा कक्ष पंच तारांकित एक खिडकी सुविधा आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यापार आणि उद्योगांची वाढ सुलभ करण्यासाठी आणि औद्योगिक प्रतिनिधीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महापालिकेच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात कक्षामुळे मदत होईल*
अग्निशामक मोटार सायकल्सचे हस्तांतरण
पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरूंद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर, इत्यादी ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीने व सहजपणे पोहचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. या वाहनात २०+२० लीटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठीदेखील वाहनांची मदत होणार आहे.
ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरणचे वितरण
हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती,डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. या उपकरणाचा वापर करणे महापालिकेस सुलभ ठरणार असून कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे
पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता ५० स्मार्ट मोटारसायकल्सचे हस्तांतरण
शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचे पोलिस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता स्मार्ट मोटारसायकल्सचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी या दुचाकी वाहनांची मदत होणार आहे.