लोणी काळभोर -श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३७ वा आषाढी वारी पालखी सोहळा शनिवार ( २५ जुन) रोजी लोणी काळभोर येथे मुक्कामी येत आहे. येथील पालखीतळासाठी दहा वर्षापुर्वी जागा आरक्षित करण्यांत आली आहे. सदर जागेवरील अतिक्रमण हटवून वारक-यांना मुक्कामासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी शासनाकडे केली आहे.
नुकत्याच जिल्हाधिकारी-यां समवेत झालेल्या बैठकीत पालखी सोहळा प्रमुख हभप संतोष महाराज मोरे, हभप संतोष महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, विश्वस्त हभप नितीन महाराज मोरे, हभप भानुदास महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, हभप अमित महाराज मोरे यांनी पालखीतळावरील अतिक्रमण हटवून वारक-यांसाठी चारही बाजूस पिण्याच्या पाण्याची सोय, एक दिवसीय निवा-यासाठी वीज, पाणी, मलमुत्र विसर्जनाची व्यवस्था, व इतर आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार यांचेसमवेत सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
केवळ हवेलीतीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील पालखीतळांपैकी सर्वात मोठा पालखीतळ लोणी काळभोर परिसरात विकसीत झाला आहे. प्रतिवर्षी वाढणारी वारकरी संख्या व त्याच्या निवासाची योग्य सोय व्हावी याचा दूरगामी विचार करून सन २०१२ मध्ये तत्कालिन उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल व हवेलीचे तहसीलदार संदेश शिर्के यांनी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या १५ एकर खानपड व गायरान जमिनीवर पालखी तळ म्हणुन आरक्षण टाकले होते. त्यावेळी या ठिकाणी जॉगिग ट्रॅक, पोहण्याचा तलाव, समाज मंदिर, मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन, मुलांना खेळण्यासाठी भव्य क्रिडांगण, व्यायामशाळा, शौचालयाची सुविधा, तसेच पक्ष्याना आश्रय देण्यासाठी वड, पिंपळासारख्या मोठ्या झाडांचे वृक्षारोपण आदी बाबी करण्याचे नियोजित होते.सदर तळ वर्षांतून फक्त दोन दिवस पालखीसाठी तर उर्वरित ३६३ दिवस लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या स्थानिक नागरिकांना विविध सामाजिक,धार्मिक व इतर उपक्रमासाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यायचे त्यावेळी ठरले.
२६ मे २०१२ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.येथील दगडखाणीच्या जागेवर सुमारे वीस फूट खोल व तेवढेच रूंद खड्डे होते. ते भरून काढणे म्हणजे दिव्य होते.तत्कालीन गावकामगार तलाठ्यांनी लोकसहभागातून येथे दगड, माती व राडारोडा टाकून घेतला. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून उपलब्ध झालेल्या रकमेतून चारही बाजूस संरक्षक भिंत, पालखीसाठी चार हजार स्क्वेअर फूटाचा सभामंडप, त्यामध्ये विश्वस्तांसाठी दोन खोल्या, स्वयंपाकघर, अंघोळ व शौचालयाची सुविधा आदी कामे करण्यात आली आहेत. तीन ठिकाणी घेण्यांत आलेल्या विंधन विहीरींना मुबलक प्रमाणांत पाणीही लागले. त्यामुळे सदर जागा राहण्यायोग्य झाली. पालखी सोहळा लोणी काळभोरमध्ये आलेनंतर नेहमीप्रमाणे मुक्काम विठ्ठल मंदिरांत असतो. जागा प्रशस्त असल्याने कसलीही अडचण येत नाही. प्राथमिक शाळा, हायस्कूल, गावांतील मंदीरे व गावठाणांतील मोकळी मैदाने यांठिकाणी दिंड्या मुक्कामी असतात. पाऊस नसेल तर कसलीही अडचण येत नाही. परंतू पाऊस आला तर ऊघड्या मैदानांत ऊतरलेल्या दिंड्यांच्या तंबूत पावसाचे पाणी जाते. त्यांमुळे त्या दिंड्यांतील वारक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. करोनामुळे गेल्या दोन वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने येथे राडारोड्याचे साम्राज्य ऊभे राहिले आहे. काटेरी झाडे उगवली आहेत. तर काही मद्यपी तेथे सर्रास मद्यपान करताना दिसत आहेत. पालखीतळ पुर्णपणे विकसित झाला तर या अडचणींपासून त्यांची सुटका होणार असल्याने तो लवकर व्हावा अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.