मुंबई, दि. ९: राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. तसेच राज्यात मॅटवरील कबड्डीच्या स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज दिल्या. दि. १५ जुलै रोजी बालेवाडी-पुणे येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी समितीच्या सभेचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी समितीच्या सभेचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष शशिकांत गाडे, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, उपाध्यक्ष नेत्रा राजेशिर्के, सरकार्यवाह ॲड आस्वाद पाटील, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, मनोज पाटील, जिल्हा प्रतिनिधी बाबुराव चांदेरे, नितीन बरडे, लिना करपे-कांबळे, सचिन भोसले, कबड्डी असोसिएशनचे समन्वयक अविनाश सोलवट यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणीच्या सभेत कबड्डी दिन साजरा करणे, विविध गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, व्यावसायिक गट व इतर मान्यताप्राप्त स्पर्धेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक मुद्यावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा संहिता २०११ नुसार तीन उत्कृष्ट व प्रख्यात खेळाडूंची राज्य सल्लागार समितीवर नियुक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. असोसिएशनच्या शिवाजी पार्कस्थित इमातरतीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता यावेळी देण्यात आली.