लोणी काळभोर – संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळा आज उंडवडी गवळ्याची मुक्कामी गेला तरीही पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथे ठेकेदाराने राडारोडा महामार्गालगत गोळा करून ठेवला आहे. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास कवडीपाट (ता. हवेली) ते कासुर्डी फाटा (ता. दौड) या २७ किलोमिटर अंतरातील महामार्गाची स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते. परंतू या आदेशाला न जुमानल्याने महामार्गावर जमा करण्यात आलेली दगडमाती अद्यापही जैसे थे आहे. वारकऱ्यांची वाट सुखकर होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला पालखी मार्गावरील झाडे काढणे, झाडे झुडपे काढून स्वच्छ करणे, विद्युत पुरवठा, आदी वारक-यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गात कोणत्याही अडीअडचणींचा सामना वारकऱ्यांना करावा लागू नये अशा सूचना दिल्या होत्या. लोणी काळभोर येथे पालखी सोहळा येण्यापूर्वी आठ दिवस अगोदर माती उकरली परंतू ती न उचलता महामार्गालगत ढिग ठेवला. शुक्रवार (२४ जुन) रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ग्रामीण भागातील पहिल्या तसेच हवेली तालुक्यातील शेवटच्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथे आगमन झाले. शनिवार (२५ जुन) रोजी प्रस्थानही झाले. आज पालखी सोहळा उंडवडी गवळ्याची येथे पोहोचतो आहे. परंतू सदर मातीचे ढिग महामार्गालगतच पडून आहेत. थोड्याशा पावसानेही त्याचा चिखल होवून रस्त्यावर येत असलेेेने अपघातास निमंत्रण मिळत आहे. जर मोठा पाऊस आला तर चिखल होऊन तो रस्त्यावर पसरेल त्यामुळे महामार्गावरून प्रवास करत असलेल्या प्रवाश्यांचे अडचणीत आणखी भर पडणार आहे.