पुणे

“पुण्यात शिवसेनेला खिंडार पडून एकनाथ शिंदे गटाचा होणार शिरकाव, “शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे मुख्यमंत्र्यांच्या गळाला… “पालिका निवडणूक अन शिंदे गटाच्या पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी?

महाराष्ट्रात बंड करून शिवसेनेला खिंडार पाडून सत्ता हस्तगत करणारे एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळविला आहे, पुण्यातील शिवसेनेचे दिग्गज लोक आपल्या गटात घेण्यासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे समर्थक माजी नगरसेवक शिवसेनेचे युवा नेतृत्व प्रमोद नाना भानगिरे हे या गटाच्या वाटेवर असून शिवसेनेला यानिमित्ताने पुणे शहरात मोठा राजकीय फटका सहन करावा लागणार आहे.
तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे आले होते याचे कारण पुणे महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर तेथे प्रशासक बसल्यावर निधी मिळण्यात अनेक अडचणी येऊ लागल्या, त्यामुळे त्रस्त भानगिरे यांनी थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आयुक्त विक्रम कुमार यांना फोन लावण्यात सांगितला याची तातडीने दखल घेत पुणे महापालिका आयुक्तांनी तब्बल दीडशे कोटी निधी मंजूर केल्याने नगरसेवक नाना भानगिरे यांना चांगलेच बळ मिळाले होते.
शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्याशी वर्चस्वातून असलेला सुप्त संघर्ष, नगरसेवक असताना राजीनामा देऊन भानगिरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शिवसेनेमध्ये त्यांना मानणारा चांगला मोठा गट आहे.
सरकार पाडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यावर मुंबईमध्ये जो संघर्ष झाला होता व आमदार हॉटेलमध्ये तेथून सुरतला हलविले या दरम्यान प्रमोदनाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांना चांगलीच मदत केल्याचे चर्चेत आहे
नाना भानगिरे यांच्याही राजकीय आकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत त्यांना आमदार व्हायचे होते परंतु हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला न येता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला व युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही त्यांची आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा आहे, अनेक मोठमोठी विकास कामे याबरोबर भव्य उपक्रम राबवून त्यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री उदय सामंत अशा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांशी दांडगा जनसंपर्क ठेवला होता सचिन अहिर यांच्या खास मर्जीतले नगरसेवक म्हणून भानगिरे गणले जात होते.
त्यातच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडून शिवसेनेचा एक गट शिवसेनेपासून बाजूला झाला व एकनाथ शिंदे अनपेक्षीतपणे मुख्यमंत्री झाले त्यामुळे नाना भानगिरे सारख्या कार्यकर्त्याला बळ मिळाले,
राज्यपालांनी नियुक्त करायच्या 12 विधान परिषदेच्या जागा प्रलंबित असून एकनाथ शिंदे व भाजप पुन्हा नवी यादी देणार असल्याने शिंदे गट हातपाय पसरण्यास साठी पुण्यामध्ये चांगला मोहरा गळाला लागल्याने माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांना विधानपरिषदेवर आमदार करून पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. किंवा महामंडळ देऊन पुण्यात आपला दबदबा निर्माण करण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री विजय शिवतरे यांनीही एकनाथ शिंदे यांचं कौतुक करून शिवसेनेला त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी जाहीर आवाहन केल्याने ते देखील शिंदे गटात जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुरंदर मधून देखील शिवसेनेचा मोठा गट आयताच मुख्यमंत्री शिंदेंच्या हाती लागणार आहे.
नाना भानगिरे यांचा पुणे शहरात चांगला संपर्क असून शिवसेनेतील दिग्गज नेते त्यांच्या संपर्कात आहेत, एकनाथ शिंदे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून भानगिरे यांची गणना होत असल्याने आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र व पुण्याची जबाबदारी भानगिरे यांच्यावर टाकण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.
त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने नाना भानगिरे यांना पुण्यामध्ये विकास कामे करताना जास्तीचा निधी मिळून हा गट सक्षम करण्यासाठी ताकद मिळणार आहे.
तीन वेळा शिवसेनेतून नगरसेवक राहिलेले प्रमोद नाना भानगिरे यांनी जर शिवसेना सोडून शिंदे बंडखोर गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला तर हडपसर विधानसभा बरोबरच पुणे शहरात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली असून या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका बसेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे नाना भानगिरे यांनी मुंबई तळ ठोकला असून मोठा शब्द घेऊनच पुन्हा पुण्याला परतण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात अनेक घडामोडी या शिवसेनेचे पुढील भवितव्य ठरविणार आहेत मात्र शिवसेना की शिंदे गट यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.