पुणे

अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करणारे तिघे जेरबंद हडपसर पोलिसांची कारवाई ः दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

पुणे  ता. ८ ः अवैध दारू व अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली. हडपसर पोलिसांनी जून २०२२ मध्ये सात कारवाईमध्ये सात वाहनांसह दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.

श्रीराम ज्ञानोबा तांबडे (वय २४, रा. उबाळेनगर, वाघोली, पुणे), दीपक कैलास परांडे (वय ३२, रा. रेणुका पार्क, उबाळेनगर, वाघोली) व योगेश अनंत मोराळे (वय २२, रा. बाणेगाव,, मु.पो. बाभळगाव, ता. केज, जि. बीड, सध्या रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गोकुळे म्हणाले की, आज (शुक्रवार, दि. ८ जुलै, २०२२) पहाटे चारच्या सुमारास मारुती इको वाहनामध्ये ब्रँडेड दारूची गोवा-पुणे अशी वाहतूक होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून मंतरवाडी चौक, फुरसुंगी येथे पकडले. तिघांना ताब्यात घेऊन इको गाडीमध्ये मॅकडॉल, रॉयल स्टॅग, इंम्पेरियल ब्लू अशा एक हजार ३२ विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. १९ जून ५० लीटर गावठी दारू तीन लाख ६९हजार, ६ जून ७७० लीटर गावठी हातभट्टी दारू, चारचाकी आठ लाख ९ हजार रुपये, २६ जून ४० लीटर गावठी हातभट्टी, दुचाकी एक लाख ५४ हजार ८०० रुपये, २९ जून आयशर ट्रक ६२ लाख १८ हजार ७७० रुपये, २९ जून ७३ किलो गांजा २० लाख ६२ हजार ९४० रुपये, २ जुलै ३१५ लीटर गावठी हातभट्टी ५ लाख ३१ हजार ५०० रुपये, ८ जुलै १०३२ विदेशी दारूच्या बाटल्या व मारुती इको ५ लाख २५ हजार असा एकूण एक कोटी ५४ लाख ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.