हडपसर पोलिसांची कामगिरी ः घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील १० लाखांचे २० तोळे सोने जप्त
अशोक बालगुडे
उंड्री, ता. १८ ः बनावट चावीने सदनिका उघडून सोन्याची चेन, गंठण, अंगठी, कानातील टॉप्स असा ७० ग्रॅम वजनाच्या तीन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या जावयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हडपसर पोलिसांनी पाच महिन्यात ६७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून सोने, मौल्यवान दागिने आणि वाहने असा ६७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
निखील संभाजी पवार (वय २३, रा. संभाजीनगर चाळ, जयसिंगपूर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्वजीत अशोक कांबळे (रा. इंद्रायणी सोसायटी, साडेसतरानळी, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दिली होती. दरम्यान, दुसऱ्या घटनेत जमील अयुब शेख (वय ४५, रा. केदारी हाईट्स, शिवाजी पुतळ्याजवळ, दापोडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अॅड. शिवाजीराव जनार्दन पाटील (वय ७०) यांचे ड्रायव्हरनेच प्रवासात १५ तोळ्यांचे दागिने चोरून नेले होते.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सूरज कुंभार, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.