हडपसर ः (प्रतिनिधी)
मोबाईलवर किंवा चौकाच्या बाजूला थांबत असतील, अशा कामचुकारांवर कारवाई केली जाईल. पालिकेच्या संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करून तातडीने उपाययोजना केल्या जातील. तसेच नागरिकांच्या सूचनांचा आदर करून हडपसरमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न राहील, असे हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले.
हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नागरिकांशी थेट संवाद आयोजित केला होता. याप्रसंगी माजी नगरसेवक योगेश ससाणे, गणेश ढोरे, संजिवनी जाधव, सागरराजे भोसले, डॉ शंतनू जगदाळे, व्हिजन हडपसरचे अनिल मोरे, तुषार पायगुडे, दिपक गायकवाड, दिगंबर माने, उल्हास तुपे, महेश ससाणे, आदी उपस्थित होते.
व्हिजन हडपसरचे सदस्य अनिल मोरे म्हणाले की, सोलापूर रस्त्यावरील सिरम कंपनीचे गेट चार ते सहाऐवजी चार ते आठ दरम्यान खुले ठेवावे, परवानाधारक पथारी व्यावसायिकांचे उड्डाण पुलाखाली पुनर्वसन करावे, रस्त्यावर बसणाऱ्यांना तातडीने हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा, गांधी चौकातील पार्किंग सुरू करावी, पर्यायी रस्ते सक्षम करावे म्हणून वाहतूक विभाग, महापालिका, लोकप्रतिनिधी यांनीं पुढाकार घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले की, निर्धारित रक्षा स्टँड ते निश्चित करून तेथे नियमानुसार पाच-दहा रिक्षांना परवानगी एक रांगेत उभ्या कराव्यात, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच, रवी पार्क आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या भुयारी मार्गाच्या चौकात सकाळी-सायंकाळी पोलीस असावा, बाद झालेल्या रिक्षा स्क्रॅप कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
भेकराईनगर, सासवड रस्ता वरील शाळांच्या बसेस बाबत पत्रव्यवहार करून रस्स्यावर कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक गणेश ढोरे, अमोल कापरे यांनी केली.
सागरराजे भोसले म्हणाले की, मगरपट्टा चौक ते लक्ष्मी कॉलनी दरम्यानच्या हॉटेलचे पार्किंग नाही, त्यामुळे त्यांनी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघात होत आहेत. पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी त्यांना कडक सूचना कराव्यात.
संजीवनी जाधव म्हणाल्या की, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, सिग्नलवर पोलीस असावेत, शाळा-महाविद्यालयातील मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होणार नाही, याविषयी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
महेंद्र बनकर यांनी सांगितले की, मगरपट्टा चौक ते लक्ष्मी कॉलनी दरम्यानच्या लक्झरी बसेसच्या दोन-तीन रांगा लावतात, त्यामुळे अपघातसदृशस्थिती होते. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.