नवीन मंत्र्यांनी स्वागत, आदर, सत्कारात न अडकता
जनतेचे प्रश्न सोडवावे, प्रलंबित कामे मार्गी लावावीत
भाजपने आरोप केलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने
त्यावेळी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध
मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधीत्व नसल्याची खंत
– विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया
मुंबई, दि. 9 :- मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या 18 नवीन मंत्र्यांचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनंदन केले असून नवीन मंत्र्यांच्या सहभागामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास तसेच राज्याच्या विकासप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या तब्बल 40 दिवसांनंतर राज्याला मंत्रिमंडळ मिळाले आहे. नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप तात्काळ व्हावे. नवीन मंत्र्यांनी स्वागत, सत्कारात अडकून न राहता विभागांचं प्रलंबित कामकाज वेगाने मार्गी लागावं, अशी अपेक्षाही विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली. आघाडी सरकारमधील आमचे अनेक जूने सहकारी नवीन मंत्रिमंडळात आल्याचा आनंद आहे, भाजप नेत्यांनी त्यावेळी आमच्या सहकाऱ्यांवर केलेल्या आरोपात खरंच तथ्य होता का ? हा प्रश्न त्यांच्या सहभागाने निर्माण झाला आहे. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महिलांचं महत्वाचं योगदान आहे. राज्यात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांचंही प्रतिनिधीत्व हवं होतं. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नाही, याचं निश्चित वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.