पुणे

केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “महागाईची दहीहंडी” चर्चेत

देशभरात अगदी नगण्य अशा सुई पासून ते मोठमोठ्या प्रॉपर्टीजपर्यंत सर्वत्र जी.एस.टी ची जोरदार वसुली सुरू आहे. जोपर्यंत सेवा आणि वस्तूंवर जीएसटी लागत होता तोपर्यंत या निरागस जनतेने कुठलीही तक्रार न करता नियमितपणे जीएसटी भरला. परंतु आता दररोजच्या जीवनात जीवनावश्यक असणाऱ्या दूधx, तूप, तेल, पनीर अगदी या गोष्टींवर देखील जीएसटी लावण्याचा काळा कायदा नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत केंद्र सरकारने लावला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जी.एस.टी भरून आणलेल्या दूध व दह्याची दहीहंडी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फोडली. विशेषतः या दहीहंडीला बक्षीस म्हणून जुमला बँकेचे १५ लाखाचे चेक देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ” एकीकडे हिंदुत्ववादी म्हणून हिंदूंची मत मिळवायची दुसरीकडे त्या हिंदूंना त्यांचा कुठलाही सण साजरा करता येणार नाही इतकी महागाई वाढवून ठेवायची, ही मोदी सरकारची नीती आहे. देशावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी देखील कधी दूध आणि दह्यावर कर लावला नाही. परंतु सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने अगदी दूध दह्यापासून जीएसटी लावण्याची प्रथा सुरू केली आहे. भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या जाणीवपूर्वक होणाऱ्या पिळवणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध करते . देशात बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ असे अनेक मुद्दे असताना या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत परंतु विरोधी पक्ष सत्ता असणारी राज्य सरकारने पाडणे , तेथील आमदारांना विकत घेणे यासाठी केंद्राकडे पैसा आहे.हनुमान चालीसा, राम मंदिर,हिंदू मुस्लिम यावर वाद निर्माण करणे या सर्व गोष्टी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी आहेत. देशात महत्वाचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना अधून मधून आपल्या प्रवक्त्यांमार्फत निव्वळ प्रसिद्धीसाठी काही चुकीचे स्टेटमेंट करून घेणे आणि जनतेचे मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवणे ही भारतीय जनता पार्टीची गेल्या आठ वर्षातील कामगिरी राहिलेली आहे.परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जनतेची काळजी घेणारी पार्टी आहे. जनतेच्या सुखदुःखात उभी राहणारी पार्टी आहे. आम्ही मात्र जनतेला या गोष्टीची एकही दिवस विसर पडू देणार नाही, मागे महागाईची होळी केली होती आता महागाईची दहीहंडी करत आहोत आणि पुढे या महागाईच्या रावणाचा वध देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करणार असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

या प्रसंगी युवकाध्यक्ष किशोर कांबळे , मा.नगरसेवक महेंद्र पठारे , मा. नगरसेवक सदानंद शेट्टी , कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर , प्रदेश सरचिटणीस महेश हांडे , वेणू शिंदे, गिरीश गुरनानि ,दिपक कामठे, आनंद सागरे , भूषण बधे, गजानन लोंढे, राहुल तांबे, मंगेश मोरे, वैभव कोठुळे , फहीम शेख,राखी श्रीराव ,जावेद इनामदार,आमोल ननावरे, केतन ओरसे , रोहन पायगुडे, कुलदीप शर्मा, उमेश कोढाळकर , स्वप्नील थोरवे आदींसह मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.