हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
गाववालो… सुसाइड… म्हणीत कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
त्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना शोले चित्रपटातील वीरूची आठवण येथील ग्रामस्थांना झाली. त्याचा अभिनयही अभिनेता धर्मेंद्रच्या तोडीचा होता. मात्र, त्याची मागणी पूर्ण होण्याऐवजी लोणी काळभोर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुण हा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील समतानगर परिसरात त्याच्या बहिणीकडे राहत आहे. बहिनेने त्याला जेवायला उशिरा देते असे म्हणल्याच्या कारणावरून तरुणाने टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास एक तरुण पाण्याच्या टाकीवर चढला. सुरुवातीला रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. नंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. ‘मी उडी टाकतो… मला मरायचे आहे.’, असे म्हणत आरोळ्या दिल्याने गर्दी जमली. त्यातील काही नागरिकांनी त्याला खाली येण्याची विनंती केली मात्र ‘त्याने वर कोणी आले, तर मी उडी टाकेन’, अशी धमकी दिली. घडल्या प्रकाराने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी लोणी काळभोर पोलिसांना फोन करून माहिती दिली. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई घनश्याम आडके व ईश्वर भगत घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, तरुणाने सदर ठिकाणी नागरिकांना उडी टाकत असल्याचे भासविले. प्रत्यक्षात दोन्ही हातांनी टाकीचे लोखंडी कठडे घट्ट धरून ठेवले होते. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत सदर ठिकाणी तत्काळ पोहचून तरुणाची समजूत काढली व टाकीवरून खाली उतरविले. मात्र त्याने हा प्रयत्न का केला असे विचारले असतात त्याने बहिणीशी वाद झालेल्या कारणांमुळे मी असे पाऊल उचलले असे तो म्हणाला.
सदर घडलेल्या प्रकाराची दखल घेत कदम-वाकवस्ती ग्रामपंचायत सरपंच गौरी गायकवाड यांनी तातडीने तेथे लोखंडी गेट बसविले.