पुणे

लोणी काळभोर रामदरा रोड ला पकडला ६ लाखाचा गांजा ,

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर -पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीकरीता आणलेला ६ किलो गांजा, दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ४३ हजार १० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

       अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई योगेश नामदेव मांढरे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सुरेश रामदास पवार (वय ३९  रा. कुंजीरवाडी, मुळगाव मु.पो. आसु, ता. परांडा, जिल्हा उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पोलीस पथकास  ३१ ऑगस्ट रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत एकजण गांजा हा अंमली पदार्थ  बेकायदेशिररित्या विक्रीकरीता आणणार अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. 

        त्यानुसार सदर पोलीस पथक सकाळी ११ वाजता लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील काळुबाई मंदिराच्या समोरील रामदरा मंदिराकडे जाणा-या रोडचे कडेला डाव्या बाजुस अंबरनाथ वजन काटा समोर पोहोचले. तेथे सुरेश  पवार हा हिरो होंडा दुचाकीवर थांबला होता. दुचाकीचे मागील बाजूस एक पोते बांधले होते. पथकाने अचानक छापा टाकून सुरेश पवार याला जेरबंद केले. पोत्यांची तपासणी करत असताना मादक वास आला म्हणून त्याबाबत चौकशी केली असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये १ लाख २० हजार रुपये किमतीचा६ किलो वजनाचा गांजा आढळला. याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांने सदर गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलीसांनी गांजासह २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व १० रूपये किंमतीची दोरी असा एकूण १ लाख ४३ हजार १० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पवार यास लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे हे करत आहेत.